मुंबई : अन्न औषध प्रशालन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, आता हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे यांच्याबाबत एक मोठा आदेश काढला आहे. येथे ग्राहकांना पिण्यायोग्य पाणी मोफत देणे गरजेचे आहे. तसा बोर्ड त्यांनी लावावा अन्यथा कारवाई करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
ग्राहकांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी हॉटेल्सना केवळ अन्न-पाण्यापुरतेच मर्यादित न राहता इतर सोयी पुरवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. हॉटेलमध्ये आल्यानंतर ग्राहकांना सुरक्षित पाणी, हात धुण्यासाठी द्रवसाधन, स्वच्छ टॉवेल आणि साबण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मूलभूत सुविधांमुळे ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा
"स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही," असे सांगत तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' या मोहिमेचा मुख्य उद्देशच नागरिकांचे आरोग्य जपणे हा आहे. जे हॉटेल चालक या नियमांचे उल्लंघन करतील, ग्राहकांना मोफत पाणी नाकारतील किंवा स्वच्छतेचे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार परवाना रद्द करण्यापासून ते दंडात्मक कारवाईपर्यंत कडक पावले उचलली जातील. मुंढे यांच्या या निर्णयामुळे हॉटेलमध्ये पाण्याच्या नावाखाली होणाऱ्या लूटमारीला चाप बसणार असून सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.