सातारा : खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे प्रस्तावित एसटी बसस्थानकाच्या जागेची महसूल नोंदणी पूर्ण करण्यात होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी प्रशासनाने संबंधित प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
पुसेगाव हे धार्मिक, शैक्षणिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जाते. गावातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊन आधुनिक बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे. यासाठी आवश्यक जागाही निश्चित करण्यात आली असून निधीची उपलब्धता असल्याचे सांगितले जाते. मात्र, जागेच्या सातबारा उताऱ्यावर आवश्यक नोंदी पूर्ण न झाल्याने प्रकल्प रखडल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे.
याच पार्श्वभूमीवर सुशांत मोरे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित नोंदी प्रलंबित राहण्यामागील कारणांची सखोल चौकशी करावी आणि बसस्थानकाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनाची दखल घेत तहसीलदारांनी संबंधित जमिनीपैकी काही क्षेत्राची नोंद पूर्ण झाल्याची माहिती दिली. उर्वरित नोंदीही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, तसेच ७ जुलै रोजी महसूल विभाग, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक, युवक, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.