शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी - जिल्हा कृषि अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 24 June 2026


सातारा :  "अल निनो "च्या पार्श्वभूमीवर या वर्षी मान्सूनवर व हवामानावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. त्यामध्ये तापमान वाढ, पावसातील खंड, अति पाऊस, इ. मुळे पिकांवर कीड रोगांचा उद्रेक होऊ शकतो. मागील काही वर्षांपासून सोयाबीन पिकावरील येलो मोझाईक, गोगलगाय, लष्करी अळी, हुमणी किडीच्या तसेच विविध पिकांवरील मर रोग प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे कीड रोगाचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कीड व रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.  

बीजप्रक्रिया म्हणजे बियाणे पेरण्यापूर्वी त्याला विविध बुरशीनाशके, कीटकनाशके व जैविक, औषधे लावण्याची प्रक्रिया होय. ज्यामुळे मातीतून आणि बियाण्यातून पसरणाऱ्या रोगांपासून पिकांचा बचाव होतो. बीजप्रक्रीया ही अतिशय कमी खर्चाची पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे.

बीजप्रक्रिया केल्याने बियाणे व पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण होते, उगवण क्षमता, अंकुरण क्षमता सुधारते. रोपे अधिक निरोगी व जोमदार होतात. खत उपलब्धता होते व त्याचा कार्यक्षम वापर होतो. हवामानातील बदलांना तसेच कीड रोगांना तोंड देण्याची पिकांची क्षमता वाढते.  बीजप्रक्रीया कशी करावी- 

रासायनिक व बुरशीनशाकाची बीजप्रक्रिया पेरणीच्या 12 ते 24 तास अगोदर करावी. जैविक बीजप्रक्रिया पेरणीच्या 1 ते 2 तास अगोदर करावी. बीजप्रक्रीयेसाठी बियाणे प्लास्टिक कागद किंवा ताडपत्रींवर पसरवून घ्यावे. शिफारशीनुसार बुरशीनाशक, कीटकनाशक, जैविक औषध बियाणेवर टाका. पावडर असेल तर पाण्याचा हलकासा शिंतोडा ‌द्यावा. दोन्ही हातांनी (हातमोजे घालून) किंवा प्लास्टिक पिशवीत बियाणे भरून हलक्या हाताने घोळावे जेणेकरून प्रत्येक दाण्याला औषधाचा पातळ थर बसेल. बियाणे सावलीत १ ते २ तास कोरडे होऊ द्या आणि नंतर पेरणीसाठी वापरा. बीजप्रक्रिया करण्यासाठी सर्वात प्रथम बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक व सर्वांत शेवटी जैविक औषधांची प्रक्रिया करावी. रासायनिक बीजप्रक्रिया केल्यास ३-४ तासांनंतर जैविक संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य; आंबेनळी घाटासह अपघातप्रवण मार्गांवर विशेष उपाययोजना; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती.
पुढील बातमी
आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या