पाटण : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना, नवजा व महाबळेश्वर या ठिकाणी सरासरी ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसाने आणखी दमदार हजेरी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावल्याचे दिसून येते.
सकाळपासून पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाने संततधार चालू केली आहे. सकाळी आठपासून पावसाने सुरुवात केली. सायंकाळनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा व महाबळेश्वर या ठिकाणी सरासरी ५० टक्केपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयना ६१, नवजा ५२, तर महाबळेश्वर येथे ४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जून ते आजअखेर एकूण कोयना ९६, नवजा १३९, महाबळेश्वर ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
बळीराजा सुखावला
सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गेली महिनाभर प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली असून, दमदार पावसाची वाट आता शेतकरी पाहात आहेत.