सातारा : सातारा तालुक्यातील लिंब ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश शेटे, विजय दाजी शिंदे, रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अधिक पाटील आणि माजी सैनिक चंद्रकांत सावंत यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समिती सातारा येथील विस्तार अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत ग्रामपंचायतीच्या नोंदी व विविध विकासकामांवरील खर्चाबाबत काही अनियमितता निदर्शनास आल्या आहेत. वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
चौकशी अहवालातील बाबी गांभीर्याने घेऊन संबंधितांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीच्या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता राखून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि चौकशीच्या निष्कर्षांनुसार पुढील काय कारवाई होते, याकडे लिंब ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.