सुरुर ते पोलादपूर रस्त्यात केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून संस्थात्मक खून - रयत राज संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा आरोप

by Team Satara Today | published on : 23 June 2026


सातारा : सुरुर- वाई- पाचगणी- महाबळेश्‍वर- पोलादपूर असा 326 कोटी रुपयांचा रस्ता असला तरी या रस्त्याच्या उपठेकेदाराने 34 कोटीची दलाली लाटली असून हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून तो अधिकृत प्रशासकीय पाठबळावर केलेला संस्थात्मक खून आहे, अशा शब्दांत रयत राज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप लक्ष्मण शिंदे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला आहे. 

सुरुर -पाचगणी- महाबळेश्‍वर- आणि पोलादपूरला जोडणार्‍या सुरूर-पोलादपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून संथ आणि निकृष्ट गतीने सुरू आहे. यामुळे सध्या हा घाट रस्ता काही ठिकाणी उखडला आहे. आणि अनेक ठिकाणी खड्डे व अपूर्ण कामे आहेत. एक महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांना प्राण गमवावे लागले. दिल्ली पासिंगची एक कार या घाटात कोसळली होती. या दिल्ली पासिंगच्या अपघाताची माहिती समोर आलेली आहे. दुर्दैवाने याबाबतची माहिती सातारा रायगड पोलीस प्रशासनाला नाही. याचा अर्थ आंबेनळी घाटातील निकृष्ट दर्जाच्या कामावर होणार्‍या अपघाताबाबत शासन गंभीर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हैदराबाद येथील एका कंपनीने स्थानिक उप ठेकेदार नेमला असून या ठेकेदाराला कुठल्याही प्रकारची दया नसून निधी लाटण्याचा त्याला आनंद वाटत आहे. मृत्यूच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार भयानक आहे. या महत्वकांक्षी रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी ज्या बांधकाम विभागाच्या प्रामाणिक अधिकार्‍यांनी शिफारसी केलेल्या आहेत. त्या अधिकार्‍यांची बदली करण्यामध्ये या भोसले नावाच्या उप ठेकेदाराला कोण पाठीशी घालत आहे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

पावणे दोन वर्षांपूर्वी या कामाची वर्क ऑर्डर 326 कोटीची होती. त्यामध्ये 34 कोटीची दलाली लाटून कोरेगाव तालुक्यातील विविध 50 बँकेमध्ये हे पैसे वळवले आहेत. हैदराबादची कंपनी ने कोणत्याही कामाचा अनुभव नसणारी उप ठेकेदारांची कंपनी म्हणजे बड्या अक्काच्या इशारावर चालणारी खंडणी बहादूरांची एक खिडकी योजना आहे. असे त्यांनी सांगितले.

हा रस्ता जेवढा जाणीवपूर्वक रखडवला, तेवढ्या प्रमाणात निधी वाढ होण्याची अपेक्षा ठेवूनच हे काम संथ गतीने होत आहे. मूळ कामाची निविदाही 289 कोटीची असून त्यामध्ये 17.11 टक्के वाढ केलेली आहे. या कामाबाबत कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे आठवड्याला दोन अपघात होत आहेत. मूळ काम घेणारी कंपनी फ्री इन्फ्रा हे केवळ जीएसटी नंबर चा वापर करून उप ठेकेदार याच्यावर चांगलीच दया केलेले आहे. असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी तेवढ्यात दर्जेदार कंपनीचीच आवश्यकता असते. परंतु या ठिकाणी फक्त पैसा कमवा... पैसा जिरवा.. अशीच योजना झाली आहे का? असाही त्यांनी पत्रकारांनाच सवाल केले आहेत. काही मंत्र्यांशी सलगी करून उप ठेकेदार बदलीचे रॅकेट चालवत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आय आर बी अशा नामांकित संस्थेमध्ये या उप ठेकेदाराचा शिरकाव असतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी चित्रीकरण केले जाते. त्या आधारे ब्लॅकमेलिंग केल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

या उपठेकेदाराच्या संपत्तीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून त्यांनी स्थापन केलेल्या 13 कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केलेली आहे. सुरुर ते पोलादपूर रस्त्यावर आधुनिक पेवर मशीन ऐवजी हाताने निकृष्ट दर्जाचे कॉंक्रिटीकरण व निकृष्ट दर्जाचे बार वापरले आहेत. बॅरिगेटिक न करता मजुरांच्या जीविताशी खेळ आहे.

एक महिन्यापूर्वी म्हणजेच 24 मे रोजी सातारा जिल्ह्यातील आठ निष्पाप तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. त्याला एक महिना पूर्ण होऊन सुद्धा संबंधित उपठेकेदाराच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. त्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली अटक करावी. एसआयटी पथकाच्या मार्फत त्याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. या रस्त्याचे कोर टेस्टिंग आणि क्यूब टेस्टिंग करून उप ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे आणि त्याला काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी केलेली आहे. परंतु उपठेकेदाराला तुरुंगवास होत नाही तोपर्यंत रयत राज संघटना लढा थांबवणार नाही, असाही इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लक्ष्मण शिंदे यांनी दिलेला आहे.

या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत संदीप देशमुख, शिवाजी चोरट, शिव शिंदे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सुरूर ते पोलादपूर रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे महाबळेश्‍वर बंद करण्यात आले होते, याचीही यावेळी आठवण करून देण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात पाऊस अखेर सक्रिय; कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
पुढील बातमी
लिंब ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीला गती देण्याची मागणी; जिल्हा परिषदेसमोर ग्रामस्थांचे उपोषण

संबंधित बातम्या