सातारा : पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर कुर्हाडीने जीवघेणा हल्ला करणार्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 वर्ष 9 महिने साधा कारावास व 12 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी की, 21 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास क्षेत्रमाहुली (ता. जि. सातारा) येथील रुबाब बेकरीसमोर ही घटना घडली होती. आरोपी अक्षय संभाजी आढाव (वय 21, रा. क्षेत्रमाहुली, सातारा) हा फिर्यादी ओंकार यशवंत देशमुख (रा. क्षेत्रमाहुली, सातारा) याच्याकडे पैशांची मागणी करत आला होता. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने तू मला पैसे देत नाहीस, तुला जिवे ठार मारीन अशी धमकी देत हातातील कुर्हाडीने फिर्यादीच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी बाजूला झाल्याने वार चुकला. त्यानंतर आरोपीने पुन्हा पाठलाग करून कुर्हाडीने डोक्यावर वार करत त्याला जखमी केले.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (डी.जे.-2) एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील यांनी बाजू मांडली. खटल्यात एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
सादर झालेला पुरावा, साक्षीदारांची साक्ष आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अक्षय आढाव यास भारतीय दंड संहितेच्या कलम 324 अन्वये 1 वर्ष 9 महिने साधा कारावास व 12 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच दंडाच्या रकमेतून 10 हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या खटल्याच्या कामकाजासाठी सातारा शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.