सातारा : गणेशवाडी परिसरात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी कारवाई करून मद्यसाठा व दुचाकी जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागठाणे-सासपडे मार्गावरील निकम वस्ती शिवारात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस कर्मचारी सुमीत आनंदराव साळुंखे यांच्या पथकाने आरोपीकडून ९० मिलीच्या १२ देशी दारूच्या बाटल्या आणि हिरो होंडा प्लेझर दुचाकी जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत ३१ हजार २८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी अरविंद अण्णा साळुंखे (वय ६९, रा. नागठाणे, ता. जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.