कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन; रयत क्रांती संघटना आक्रमक

रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

by Team Satara Today | published on : 22 June 2026


सातारा : कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग, सातारा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, पीएफ व ईएसआयसीच्या रकमांबाबत सुरू असलेल्या समस्यांविरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.

रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत असून, संबंधित प्रश्नांबाबत अनेकदा निवेदने व तक्रारी सादर करूनही प्रशासनाने योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन ते तीन महिने विलंबाने दिले जाते. तसेच पीएफ व ईएसआयसीच्या रकमाही वेळेवर जमा होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत वेतन अदा करणे, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार मानधन देणे आणि पीएफसह इतर वैधानिक लाभ नियमितपणे जमा करावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

मागण्यांबाबत यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही रयत क्रांती संघटनेने दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी या प्रकरणाची जबाबदारी राज्य शासन व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांवर राहील, असे स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरफोडी करणार्‍या डिलेव्हरी बॉय असलेल्या संशयितास अटक; गुन्ह्यातील 13 लाखांचा ऐवज हस्तगत; सातारा शहर डी.बी. पथकाची कारवाई
पुढील बातमी
गणेशवाडी परिसरात अवैध मद्यवाहतुकीवर पोलिसांची कारवाई; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या