सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे वडूज येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत सांख्यिकी विस्तार अधिकारी, प्रसिद्ध वक्ते, कवी आणि लेखक यशेंद्र क्षीरसागर यांना मुंबई येथील आर्यारवी एंटरटेनमेंट या राज्यस्तरीय संस्थेने " कलम रत्न सामाजिक पुरस्कार " जाहीर केला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय असून राज्यातील निवडक १० व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
येत्या १२ जुलै रोजी मुंबई येथे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात भव्य समारोहात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आर्यारवी एंटरटेनमेंट या संस्थेचे संस्थापक, लघुपट निर्माते समाजसेवक महेश्वर तेटांबे यांनी दिली.
या संस्थेची स्थापना २०१४ मध्ये झाली असून २०१९ पासून प्रशासन, साहित्य, संस्कृती, समाजसेवा, कला इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार या संस्थेतर्फे दिले जातात. श्री. तेटांबे यांनी कळविले आहे की; श्री. क्षीरसागर यांनी गेली तीन दशके सातत्याने लेखन करून समाजाची वैचारिक सेवा केली आहे. विविध वर्तमानपत्रात लेख आणि सदरे यशस्वीरित्या लिहिली आहेत. भारतीय संस्कृती, मनातली वादळे आणि विचारांचे चांदणे अशा तीन पुस्तकांचे ते लेखक असून " भारतीय संस्कृती" या ३०६८ ओळींच्या दीर्घ कवितेची नोंद लिमका बुक मध्ये सर्वात मोठी कविता म्हणून झाली आहे. सलग पंचवीस तास विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचा त्यांनी विश्वविक्रम केला असून त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रभाकर सामान्यज्ञान दिनदर्शिका निर्माण करून त्यांनी मोठे योगदान केले आहे. प्रशासनात ठराविक चौकटीच्या पलीकडे जाऊन विविध शासकीय योजनांची माहिती आणि प्रसार त्यांनी बातमी, लेख, कविता, व्हिडिओ, ऑडिओ इत्यादी माध्यमातून सातत्याने केला आहे. विविध व्याख्यानातून त्यांनी जनजागृती करून शासकीय भूमिका समाजात मांडली आहे. त्यातून शासन, प्रशासन आणि समाज यांची बांधणी मजबूत होण्यास मदत झाली आहे. स्वतःच्या खर्चाने विविध उपक्रम आणि स्पर्धा प्रशासनात राबवणारे मतदान जनजागृती करणारे श्री. क्षीरसागर हे अत्यंत उपक्रमशील अधिकारी असून त्यांचा गौरव करण्यात आर्यारवी संस्थेला अत्यंत आनंद होत आहे. या पुरस्काराबद्दल श्री. क्षीरसागर यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.