सातारा : करंडी, ता. सातारा येथे गावच्या विहिरीचे दूषित पाणी पिल्यामुळे तब्बल २५ हून अधिक जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाला आहे. गत महिन्यातही याच गावात पाण्यामुळे अनेकांना काविळ झाली होती. आता पुन्हा विहिरीत मृत मासे सापडल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
करंडी या गावास गावानजीक असणाऱ्या केटी बंधारे येथे बांधण्यात आलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. या विहिरीत प्रमाणापेक्षा जास्त पोटॅशियम टाकण्यात आल्याने विहिरीतील मासे मृत झाले. हे मासे सुमारे ५० किलोहून अधिक असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याठिकाणी एक शाळा व हॉटेल असून तेथील दूषित पाणी या विहिरीच्या परिसरात सोडण्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करत पाणी पुरवठा सुरू ठेवला.
यामुळेच गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सुमारे २५ हून अधिक जणांना त्रास होत आहे. विहिरीची स्वच्छता, पाण्याची तपासणी आणि योग्य देखभाल याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांना दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे. अनेक कुटुंबांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.
गेले दोन महिने येथील लोक पाण्याचे जार विकत आणून पाणी पिट आहेत. गेले दोन दिवस नागरिकांना त्रास होऊ लागल्याने कुमठे आरोग्य केंद्र व पंचायत समितीच्या आरोग्य विभागास माहिती दिली. रविवारी दुपारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गावास भेट दिली. पाणी पुरवठा होणारे ठिकाण व काही नागरिकांच्या घराची पाहणी केली. त्यात पाणी दूषित असल्याचे आढळून आले. त्यावर अधिकाऱ्यांनी पाण्याची टाकी स्वच्छ करून घ्यावी. पाणी उकळून प्यावे असा सल्ला दिला आहे.