केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत दिल्लीतच तळ; कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक दीपके यांचा निर्धार

by Team Satara Today | published on : 21 June 2026


नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जोवर पदाचा राजीनामा देत नाहीत, तोवर ‘जंतर मंतर’वरच तळ ठोकण्याचा निर्धार कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक यांनी शनिवारी व्यक्त केला. तसेच, आंदोलन सुरू ठेवण्यासाठी परवानगी वाढवून देण्याची मागणीही त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली.

परीक्षांमधील अनियमितता, वारंवार पेपरफुटी याच्या निषेधार्थ आणि या ढिसाळ कारभारासाठी केंद्र सरकारने जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी ‘सीजेपी’ने दिल्लीतील जंतर मंतर येथे दुसऱ्यांदा आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि ‘सीजेपी’ समर्थक सहभागी झाले होते. त्यांना संबोधित करताना अभिजित दीपके यांनी वरील निर्धार व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक, दिल्ली उच्च न्यायालयातील वकील दिलशाद चौधरी आदी उपस्थित होते.

‘मी प्रशासनाला विनंती करतो... देशभरातील युवक इथे आहेत. आम्हाला न्याय मिळेपर्यंत त्यांना इथे बसायचे आहे. मी दिल्ली पोलिसांना विनंती करतो की, आम्हाला परवानगी वाढवून द्यावी. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे’, असे दीपके म्हणाले. संवादाचे माध्यम खुले आहे, मात्र शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, हीच एकमेव अट असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘दिल्ली पोलिसांनी अटकेची कारवाई केली, तर सर्वप्रथम मी अटक करवून घेईन’, असेही दीपके म्हणाले.

आपल्या मागण्यांचे फलक हाती घेतलेले विद्यार्थी घोषणाबाजी करत होते. ‘धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा’ अशा घोषणा आंदोलनस्थळी घुमल्या. अभिजित दीपके यांनी थाळी आणि चमचा आणण्याचे आवाहन केले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उपसा बंदीविरोधात नागठाण्यात २३ जूनला बेमुदत चक्का जाम आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके यांचा इशारा

संबंधित बातम्या