सातारा : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, पोवई नाका येथे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गौरव चक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपअभियंता, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभागातील पाणी व स्वच्छता तज्ञ तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी योगाचे महत्त्व सांगताना कार्यकारी अभियंता गौरव चक्के म्हणाले की दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे ही काळाची गरज आहे. आधुनिक जीवनशैली, ताणतणाव, बदललेली दिनचर्या आणि वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर योग हा शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी मार्ग असल्याचे सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता वाढते, मानसिक स्थैर्य मिळते तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
जिल्हा परिषद सातारा यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध गावांमध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य तसेच ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजनांच्या सुविधा परिसरात सामूहिक योग सत्रांचे आयोजन केले. यामुळे “निरोगी गाव सक्षम गाव” हा संदेश ग्रामीण भागात पोहोचविण्यात मदत झाली.
योग दिनाच्या निमित्ताने आरोग्य संवर्धनासोबतच स्वच्छता, पाणी व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैली यांचा परस्पर संबंध अधोरेखित करण्यात आला. नागरिकांनी नियमित योग करून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन प्रज्ञा माने भोसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता यांनी केले.