सातारा–सांगली विधान परिषद निकालाकडे राज्याचे लक्ष; आज (सोमवारी) सांगलीत मतमोजणी :दुपारपर्यंत निकाल हाती येणार

by Team Satara Today | published on : 21 June 2026


सांगली :  सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून या निकालाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यात झालेल्या थेट लढतीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

या निवडणुकीसाठी एकूण ४७२ मतदारांपैकी ४७१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून तब्बल ९९.७९ टक्के मतदान झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानामुळे निकालाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

राज्यातील १७ विधान परिषद जागांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर होणार आहेत. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा–सांगली मतदारसंघाच्या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत विजय मिळवून पश्चिम महाराष्ट्रातील आपले राजकीय वर्चस्व अधिक मजबूत करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासाठीही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची मानली जात असून, या भागातील आपले राजकीय प्राबल्य वाढविण्यासाठी पक्षाने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील आणि नेते विश्‍वजीत कदम यांनी आघाडीची बाजू मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तर महायुतीकडून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यंत्रणा पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली होती. त्यामुळे निकाल हा केवळ एका जागेपुरता मर्यादित न राहता दोन्ही आघाड्यांच्या राजकीय ताकदीची चाचणी मानला जात आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचे प्रमुख रणनीतीकार आणि वरिष्ठ नेते सांगलीत दाखल झाले आहेत. मतदानानंतर विविध राजकीय गणिते मांडली जात असली तरी अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. काही राजकीय निरीक्षक महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त करत असले, तरी महाविकास आघाडीनेही विजयाचा दावा कायम ठेवला आहे.

दरम्यान, या निवडणुकीचा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा निवडणुकांची रणनीती आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजची मतमोजणी केवळ एका विधान परिषद सदस्याची निवड ठरवणारी नसून, आगामी राजकीय दिशादर्शक म्हणूनही महत्त्वाची मानली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किरकोळ वादातून सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे युवकावर जीवघेणा हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुढील बातमी
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा : निरोगी जीवनासाठी योगाचा संदेश

संबंधित बातम्या