सातारा : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचे संवर्धन आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी बैलगाडा शर्यतींच्या आयोजनातील अडचणी, शासकीय नियमावली, देशी गोवंश संवर्धन आणि ग्रामीण संस्कृतीच्या जतनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्यभरातील बैलगाडा मालक, चालक आणि शेतकरी वर्गासमोरील विविध प्रश्न उपस्थित केले. शर्यतींच्या आयोजनासाठी परवानगी प्रक्रियेत सुलभता, सुरक्षेच्या आवश्यक सुविधा, देशी बैलांच्या संगोपनाला प्रोत्साहन तसेच बैलगाडा शर्यतींना सांस्कृतिक वारसा म्हणून अधिकृत दर्जा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी बैलगाडा शर्यती या महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाशी आणि परंपरेशी घट्ट जोडलेल्या असल्याचे नमूद केले. गावागावांत सामाजिक सलोखा, सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात या शर्यतींची महत्त्वाची भूमिका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. देशी गोवंश संवर्धन, दर्जेदार बैलांची पैदास आणि पशुपालन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठीही या परंपरेचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
संघटनेने मांडलेल्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून संबंधित विषयांवर आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. शेतकरी आणि बैलगाडा शर्यतप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन या पारंपरिक क्रीडा-सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नितीन शेवाळे, कार्याध्यक्ष पै. दत्ता गायकवाड, सचिव पै. विलास देशमुख, उपाध्यक्ष पै. उदय पाटील, पै. सुभाष मांगडे, सातारा जिल्हाध्यक्ष पै. धनाजी शिंदे, बाबा निकम, विनायक देशमुख, पै. आबा मदने, रोहित यादव, पै. अण्णा ढाणे, अक्षय मोरे, गोट्या पैलवान, अनिल काटकर, मानाजी घाडगे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी, बैलगाडा मालक आणि चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमुळे बैलगाडा शर्यतींच्या विकास आणि संवर्धनासाठी संघटना व लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.