सातारा : वाई-सातारा मार्गावरील बावधन-वाकेश्वर परिसरात शुक्रवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात वाई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राठोड हे कौटुंबिक कारणास्तव रात्री उशिरा पत्नीसह कारने प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास बावधन-वाकेश्वर हद्दीत त्यांच्या वाहनासमोर अचानक एक वाहन आल्याने अपघात टाळण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळले.
धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात श्रावण राठोड यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीलाही गंभीर मार लागला असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत होते. गुन्ह्यांच्या तपासात त्यांची कामगिरी उल्लेखनीय मानली जात होती. कर्तव्यनिष्ठ आणि सहकार्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या राठोड यांच्या निधनाची बातमी समजताच पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली.
सकाळी त्यांचे पार्थिव वाई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव मूळ गावी हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेने हाती घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.