सातार्‍यात घरफोडी टोळीचा पर्दाफाश; सहा गुन्ह्यांची उकल; 27 लाखांहून अधिक माल हस्तगत

by Team Satara Today | published on : 19 June 2026


सातारा : जिल्ह्यातील विविध भागांत घडलेल्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगारास अटक केली असून त्याच्या चौकशीत सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिने, कार व मोबाईलसह तब्बल 27 लाख 65 हजार 476 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम हाती घेतली होती. पोलीस निरीक्षक विश्‍वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि घटनास्थळांवरील पुरावे यांच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.

मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीच्या तपासादरम्यान महेश भिमा शिंदे (वय 32, रा. शाहूनगर, सांगवी, ता. फलटण) याच्यावर संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून त्याचा माग काढला. 8 जून रोजी तो सातारा शहरातील संगमनगर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह केलेल्या घरफोड्यांची कबुली दिली. त्यानुसार मेढा, वाई, भुईंज, फलटण ग्रामीण आणि कोरेगाव पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत आरोपींकडून सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरण्यात आलेली कार आणि मोबाईल जप्त करण्यात आला. जप्त मालाची एकूण किंमत 27.65 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या नोंदीनुसार महेश शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत 19 गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या अनेक प्रकरणांना उकल मिळाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोकण व सातारा जिल्ह्यामधील दळणवळण अधिक सुलभ करणारा ‘केबल स्टेड स्काय ब्रिज’ पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर; पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता
पुढील बातमी
कर्तव्यदक्ष पोलिसावर काळाचा घाला; वाईजवळील अपघातात मृत्यू; अपघातात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी

संबंधित बातम्या