सांगली-सातारा मतदारसंघात ९९.८९ टक्के विक्रमी मतदान; महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला, ११ केंद्रांवर १००% मतदानाची नोंद

by Team Satara Today | published on : 18 June 2026


सातारा : सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीने आणि उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीत तब्बल ९९.८९ % मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत एक नवा विक्रम नोंदवला आहे. मतदारसंघात एकूण ८९५ मतदार असून, त्यापैकी ८९४ सदस्यांनी मतदान केले. केवळ एका मतदाराचा अपवाद वगळता सर्व लोकप्रतिनिधींनी मतदानात सहभाग घेतला. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत एकूण १२ मतदान केंद्रांवर संपूर्ण शांततेत आणि सुरळीतपणे ही प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यात थेट आणि प्रतिष्ठेची लढत होत असल्याने, या विक्रमी मतदानामुळे दोन्ही गटांतील धाकधूक आणि उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

११ केंद्रांवर १००% मतदानाची नोंद

एकूण १२ मतदान केंद्रांपैकी तब्बल ११ केंद्रांवर १००% मतदान झाले. यामध्ये वाई, फलटण, माण, कोरेगाव, सातारा, पाटण, कराड, कडेगाव, वाळवा-ईश्वरपूर, पुरवठा विभाग सांगली आणि जत या तहसील कार्यालयांचा समावेश आहे.

सांगली केंद्र: येथे सर्वाधिक १५७ मतदार होते, आणि सर्वच्या सर्व १५७ जणांनी मतदान केले.

सातारा केंद्र: येथील सर्व १५२ मतदारांनी १००% हक्क बजावला.

खानापूर-विटा केंद्र: केवळ या एकाच केंद्रावर ९७ पैकी ९६ मतदान (९८.९७%) झाले. येथे एका पुरुष मतदाराने मतदान केले नाही.

दुपारी २ नंतर मतदान वेगवान

सकाळी मतदानाचा वेग अत्यंत संथ होता, मात्र दुपारनंतर मतदानाने कमालीचा वेग घेतला. सकाळी १० वाजेपर्यंत: अवघे ३.०२% (२७ मतदान) झाले होते. दुपारी १२ वाजेपर्यंत: मतदानाचा टक्का २९.२७% (२६२ मतदान) वर पोहोचला. दुपारी २ वाजेपर्यंत: अचानक चुरस पाहायला मिळाली आणि मतदानाने थेट ८१.५६% (७३० मतदान)चा टप्पा गाठला. विशेष म्हणजे पाटण आणि जत तालुक्यात दुपारी २ वाजताच १००% मतदान पूर्ण झाले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत (अंतिम): शेवटच्या दोन तासांत उर्वरित १६४ मतदारांनी मतदान केल्याने अंतिम टक्का ९९.८९%वर जाऊन थांबला. एकूण ८९५ पैकी ८९४ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले आहे.

निकालाकडे सर्वांचे लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत प्रत्येक मत दोन्ही बाजूंच्या उमेदवारांसाठी अत्यंत मोलाचे आहे. दोन्ही आघाड्यांनी आपापले मोहरे सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. आता हे विक्रमी ९९.८९% मतदान नक्की कोणाच्या पथ्यावर पडणार आणि सांगली-साताऱ्याचा विधान परिषदेचा गड कोण राखणार, याचे उत्तर मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. सध्या तरी दोन्ही गोटात विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात असून सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमधील गुटखा कारवाई संशयाच्या भोवर्‍यात
पुढील बातमी
कृष्णा, कुडाळी व वसना नद्यांमधून पाणी उपसा करण्यास बंदी आदेश जारी - कार्यकारी अभियंता सं. रा. सातपुते

संबंधित बातम्या