बेकायदा वाहतुकीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन; स्वराज क्रांती संघटनेचा इशारा

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 17 June 2026


सातारा : वाठार फाटा ते लोणंद या महामार्गावर अवैधपणे सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला असून संबंधित वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य क्रांती संघटनेने प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) दिला आहे.

स्वराज्य क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश राजाराम साबळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांना निवेदन देत वाठार फाटा ते लोणंद मार्गावर नियमबाह्य पद्धतीने जड वाहने आणि खनिज वाहतूक करणार्‍या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याचा आरोप केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, टोलनाक्यावरील कर वाचविण्यासाठी अनेक जड मालवाहू वाहने या मार्गाचा वापर करीत आहेत. यातील अनेक वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल भरून धावत असून त्यामुळे रस्त्यांवर अपघातांचा धोका वाढला आहे. सातारा-लोणंद महामार्गावरील काम सुरू असल्याने या मार्गावर आधीच वाहतुकीचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत अवजड वाहनांची वाढती वर्दळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

तसेच काही एजंटांच्या माध्यमातून महिन्याच्या ठराविक रकमेच्या व्यवहारातून या वाहनांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि विनंती अर्ज करूनही आरटीओ प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

संघटनेने संबंधित वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात या जड वाहनांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनात्ररे देण्यात आला आहे.  याबाबत तातडीने पावले उचलली नाहीत तर स्वराज्य क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जलमंदिरवर महायुतीच्या नेत्यांची बैठक; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हालचालींना वेग
पुढील बातमी
लिंगायत महिला भजनी मंडळ, सामाजिक सेवा मंडळातर्फे सातार्‍यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संबंधित बातम्या