सातारा : इतिहास, स्थापत्यशास्त्र आणि पुरातत्त्वीय वारसा यांचा अनमोल ठेवा जपणाऱ्या माण तालुक्यातील महिमानगड किल्ल्याच्या संवर्धन आणि संरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ‘राज्य संरक्षित स्मारक’चा दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्याने या परिसरातील पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणारा महिमानगड किल्ला आजही आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जतन करून आहे. किल्ल्यावरील तटबंदी, बुरूज, पाण्याची टाकी, तळे, तळघर, तसेच गोमुखी पद्धतीचे बांधकाम यांसारखे स्थापत्य अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.
मात्र, अधिकृत संरक्षण नसल्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनास अनेक अडचणी येत होत्या. अमोल एकळ फाउंडेशनच्या पुढाकाराने शिवप्रेमी व इतिहास अभ्यासकांकडून किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाठपुरावा सुरू होता. या प्रक्रियेसाठी तहसीलदार विकास आहिर यांनी किल्ल्याशी संबंधित सर्व महसुली कागदपत्रे, नकाशे आणि ७/१२ उतारे पुणे पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर अमोल एकळ, विजय चव्हाण आणि नंदकुमार कुचेकर यांनी पुणे पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांची भेट घेऊन किल्ल्याच्या संरक्षणाबाबत चर्चा केली. या पाठपुराव्याला यश मिळत पुणे विभागीय कार्यालयाने गेल्या एप्रिलमध्ये संबंधित प्रस्ताव मुंबईच्या संचालनालयाकडे पाठवला. त्यानंतर पुरातत्त्व व संग्रहालय विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयातील उपसचिवांकडे सादर केला आहे.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने महिमानगडला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होताच महिमानगडला अधिकृतपणे राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा प्राप्त होणार आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर किल्ल्याच्या दुरुस्ती, संवर्धन आणि पुरातत्त्वीय जतनासाठी शासनाकडून विशेष उपाययोजना राबविण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे किल्ल्याची ऐतिहासिक ओळख देश-विदेशातही पोचून इतिहासप्रेमी,दुर्गप्रेमी व पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक स्तरावर पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.