कोयना धरणामधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पाणी उपशाला पूर्णपणे बंदी; ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य दिले जाणार

by Team Satara Today | published on : 16 June 2026


पाटण : मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने व कोयना धरणामधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने जलसंपदा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. धरणातून पाणी उपशाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे निर्देश राज्य शासनाने काढले आहे.

कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून एक हजार ५० क्युसेक पाणी पिण्यासाठी पूर्वेकडे सोडले जात आहे. धरणाचा पाणीसाठा केवळ साडेनऊ टीएमसी एवढा असून, पाण्याअभावी वीज निर्मितीही ठप्प आहे.

भारतीय हवामान विभागाने यावर्षी पर्जन्यमान घटण्याची शक्यता वर्तविल्याने जलसंपदा विभागाने पाणी काटकसरीने वापरण्यासाठी निर्देश दिले आहेत. धरणाचा पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच वापरावा व त्याचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा, असे निर्देशात म्हटले आहे.

आवर्तने तत्काळ बंद करण्याचे स्पष्ट आंदेश दिले आहेत. याचा थेट फटका कोयना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे. शहर व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार करून पाणी जपून वापरण्याचे नियोजन करावे, अशा सूचना केल्या आहेत.

पाणीसाठा व केलेल्या कारवाईचा अहवाल दर आठवड्याला जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासता कामा नये. जिल्हाधिकारी व जलसंपदा अधिकाऱ्यांनी याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंत्री मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादीच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या; तीनही पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याबाबत एकमत
पुढील बातमी
महिमानगड किल्ल्याच्या संवर्धन आणि संरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा; अमोल एकळ फाउंडेशनच्या पुढाकाराने शिवप्रेमी व इतिहास अभ्यासकांकडून संवर्धनासाठी पाठपुरावा

संबंधित बातम्या