सातारा : महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभाग यांच्याद्वारे प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत घेण्यात येत आहे.
या सर्वेक्षणाच्या क्षेत्रीय कामासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक, पर्यवेक्षक व निरीक्षक यांचा परिचय तसेच या दोन्ही सर्वेक्षणांच्या प्रचार व प्रसिध्दी करिता बॅनर, पॅम्प्लेट्स यांचे अनावरण सोहळा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
या अनावरण सोहळयासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त शशिकांत माळी, सांख्यिकी अधिकारी डॉ. अपर्णा गुरव तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच IPSOS Research Pvt. Ltd. संस्थेचे प्रगणक व पर्यवेक्षक उपस्थित होते.
नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण/PERIODIC LABOUR FORCE SURVEY (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण/ANNUAL SURVEY OF UNINCORPORATED SECTOR ENTERPRISES (ASUSE) ही महत्वाची सर्वेक्षणे असून या सर्वेक्षणामधुन प्राप्त होणारी आकडेवारी ग्रामपातळीवर, जिल्हा आणि विभाग स्तरावर कल्याणकारी योजना व धोरण निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्व प्रगणकांनी आकडेवारी गोळा करतांना अचूक माहिती घेण्याची दक्षता घ्यावी तसेच सर्व नागरिकांनी अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.
विकसित भारत @ 2047 चे ध्येय पूर्ण करण्यासाठी अचूक व अद्यावत माहिती अत्यावश्यक आहे. तसेच पुरावा आधारित विदाचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनास उपयोग होतो. विकसित भारत @ 2047 नुसार जिल्हा हे विकासाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्याकरिता, असंघटीत क्षेत्रातील उद्योग व्यवसाय तसेच रोजगार व बेरोजगारीची वस्तूनिष्ठ माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या या सर्वेक्षणाव्दारे निर्माण होणारी सांख्यिकीय माहिती वेगवेगळ्या निर्देशकांद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास उपयुक्त होईल. शासनाच्या विविध योजना आखण्यात, वेगवेगळ्याक्षेत्रातील धोरणे निश्चित करण्यात या दोन्ही सर्वेक्षणांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे श्री. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
राज्यामध्ये PLFS आणि ASUSE सर्वेक्षणांतर्गत एकूण 6828 इतके नमुना घटक असून सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे 98 व 65 असे एकूण 163 नमुना घटक आहेत. PLFS व ASUSE या दोन्ही सर्वेक्षणांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण 163 नमुना घटकांचे सर्वेक्षण 4 अन्वेषक आणि 2 पर्यवेक्षक व 2 निरिक्षक यांच्या टीमद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे, असे उपआयुक्त शशिकांत माळी यांनी सांगितले.