महाबळेश्वर येथील ‘गोल्‍फ कोर्स’ वृक्षतोड, उत्खननप्रकरणी चेअरमन, सचिव आणि मेढा येथील एका ठेकेदावर फौजदारी गुन्‍हा

by Team Satara Today | published on : 16 June 2026


महाबळेश्‍वर : महाबळेश्वर येथील हेरिटेज मिळकत असलेल्‍या गोल्‍फ कोर्स मैदानात बेकायदा वृक्षतोड व उत्‍खनन करण्‍यात आले. याप्रकरणी ‘द क्लब’च्‍या चेअरमन, सचिव आणि मेढा येथील एका ठेकेदावर फौजदारी गुन्‍हा दाखल केला आहे. 

‘द क्‍बल’च्‍या चेअरमन मनीषा गोखले- शहा (वय ६५), सचिव लेफ्ट. कर्नल (निवृत्त) गौतम नंदी (६२, दोघेही रा. महाबळेश्‍वर आणि ठेकेदार सुहास पार्टे (४०, रा. मेढा, ता. जावली) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पालिकेचे वृक्षाधिकारी कल्याण बाजीराव हिवरे (५२) यांनी फिर्याद दिली आहे. महाबळेश्वरच्या या ‘द क्लब’च्या गोल्फ कोर्समधील वृक्षतोडीची सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गंभीर दाखल घेतली होती. अखेर पालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाबळेश्वर पालिका हद्दीतील गोल्फ कोर्स या वारसास्थळ मिळकतीमध्ये वनराई नष्ट करून मातीचे ढिगारे व उतार तयार करून रस्ते तयार केले. तसेच शेडची उभारणी करून जवळून वाहणारा ओढा वळवला असून पंप यंत्रणा उभारली आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकासकामासाठी देण्यात आलेली मंजुरी व परवानग्यांबाबत सखोल चौकशी करण्याच्या मागणीचा तक्रार अर्ज अनिल पंडित यांनी प्रांताधिकार्‍यांकडे केला होता. त्‍या अनुषंगाने डॉ. योगेश खरमाटे यांनी दि. ११ रोजी पाहणी केली. यामध्‍ये ३० झाडे तोडून विनापरवाना रस्‍ते, तारेचे कुंपन, पत्रा शेड उभारल्‍याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल डॉ. खरमाटे यांनी जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांना पाठवला होता. 

‘द क्लब’कडून झालेल्या या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर पालिकेचे वृक्षाधिकारी कल्याण हिवरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र; वळीवाचा पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या, टँकरची संख्या वाढू लागली
पुढील बातमी
शिक्षक भरतीला पुन्हा मुदतवाढ; ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिराती ३० जूनपर्यंत नोंदवता येणार

संबंधित बातम्या