सातारा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या 37 प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून मिळणार आहे.
सध्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत आहे. गावोगावी खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या वाहनांद्वारे विद्यार्थ्यांना आकर्षित केले जात असल्याने जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर परिणाम होत असल्याची बाब पुढे आली होती. यामुळे अनेक गावांमधून जिल्हा परिषद शाळांमध्येच सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याची मागणी होत होती.
शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्याकडे नागरिकांनी याबाबत मागणी केली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळांकडून प्रस्ताव मागविले. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून 37 शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच इंग्रजी माध्यमाचा अनुभव मिळणार असून, गणित व विज्ञान विषयांची इंग्रजीतील गोडी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे शहरांकडे किंवा खासगी शाळांकडे होणारे स्थलांतर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, स्पर्धात्मक परीक्षांमध्येही त्यांना भविष्यात फायदा होणार आहे. जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांचा विश्वास अधिक दृढ होण्यास या निर्णयामुळे मदत मिळणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे.
कोरेगाव तालुका : भाटमवाडी, तडवळे, समंत कोडोली, बोरजाईवाडी, पेठ किन्हई, भाडळे, वाठार गाव, तांदुळवाडी, किरोली, वाठार किरोली क्र. 1 व 2, नहरवाडी, पिंपरी, रेवडी, कण्हेरखेड, बिचुकले, दाणेवाडी, फडतरवाडी, जाधववाडी, इंदिरानगर (वाठार स्टेशन), वाठार स्टेशन, नलवडेवाडी (बि), नांदवळ, तडवळे स., वाघोली, रेवडी.
माण तालुका : शिखर शिंगणापूर, गायदरा.
खटाव तालुका : कुमठे (नागाचे), निमसोड क्र. 2, गुरसाळे.
पाटण तालुका : पेठशिवापूर.
खंडाळा तालुका : कोपर्डे.
फलटण तालुका : सुरवडी.
जावळी तालुका : सर्जापूर, सनपाने, बेलावडे, महिगाव.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या 37 प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून मिळणार आहे.
- अनिस नायकवडी शिक्षणाधिकारी, (प्राथमिक)