सातारा : प्रलंबित वेतनवाढ, महागाई भत्त्याची थकबाकी आणि इतर आर्थिक मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी सातारा विभागासह जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये घंटानाद व महाआरती आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील विविध एसटी युनिटमध्येही हे आंदोलन एकाचवेळी पार पडले.
सकाळी अकरा वाजता शेकडो एसटी कर्मचार्यांनी एकत्र येत घंटानाद केला. त्यानंतर सरकारने एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी महाआरती करण्यात आली. आंदोलनानंतर सातारा विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांना निवेदनाची प्रत देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी संतोष चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत राज्य शासनाकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी कर्मचार्यांनी एसटी कर्मचार्यांना राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, कॅशलेस मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून द्यावी, 2016 पासून कमी करण्यात आलेला वेतनवाढीचा दर पुन्हा 3 टक्के करावा, घरभाडे भत्ता वाढवून त्याची थकबाकी अदा करावी तसेच महागाई भत्त्याची थकीत रक्कम तत्काळ द्यावी, अशा प्रमुख मागण्या केल्या.
बसस्थानक परिसरात कामगार एकजुटीचा विजय असो’ आणि आमच्या मागण्या मान्य करा’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. सरकारने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा कृती समितीच्या पदाधिकार्यांनी दिला.
दरम्यान, 22 जून रोजी प्रचंड द्वारसभा आयोजित करण्यात येणार असून 29 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय समितीने जाहीर केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.