पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे.
विशेष म्हणजे, 'नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची' या उपक्रमाद्वारे पुणे, मुंबई वगळता ज्या ठिकाणी संमेलने झाली नाहीत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. दि. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी रविवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली. हे संमेलन चार दिवसांचे होणार असून, ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाड डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रविवारी झालेल्या बैठकीस ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.
पुणे विद्यापीठच का निवडले?
२०१० मध्ये ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे स. प. महाविद्यालयात झाले होते. या पर्यायाविषयी विचारले असता योगेश सोमण म्हणाले, स. प. महाविद्यालयाच्या परिसरात एखादी बस जरी बंद पडली तरी मसापपर्यंत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा पर्याय बाद करण्यात आला.