ज्येष्ठांनी संपत्तीच्या वादविवादात सामंजस्य दाखवावे: न्या. वाघमारे; सातार्‍यात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा, नाती निकोप ठेवण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 14 June 2026


सातारा : ज्येष्ठांनी पारिवारिक संबंधातील संपत्तीच्या कायदेशीर वादविवादात न अडकता शक्यतो सामंजस्याने मार्गस्थ व्हावे तसे झाल्यास नाती निकोपने विस्तारतील आणि संपत्तीचा उपयोग स्वतःसाठीही सुलभ होईल, असे आग्रही प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. प्रियदर्शनी वाघमारे यांनी केले.

येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या जनजागृती मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी सहवास महिला जेष्ठ नागरिक संघाच्या संस्थापक सुजाता कानेटकर, प्रदेश ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा समन्वयक विठ्ठलराव पिसाळ उपस्थित होते.

न्या. वाघमारे म्हणाल्या, जेष्ठ नागरिक ही देशाची अनुभव संपन्न मौल्यवान संपत्ती आहे. त्यांना कायदेशीर सुरक्षेची नितांत गरज आहे. सध्याच्या काळात डिजिटल आर्थिक व्यवहारात तसेच पारिवारिक संपत्तीच्या कायदेशीर व्यवहारात त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून डिजिटल आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगून आणि पारिवारिक व्यवहारात सामोपचाराने मार्ग काढून त्यांनी मार्गस्थ व्हावे.

प्राधिकरणाच्या बचाव सल्लागार सुचेता पाटील म्हणाल्या, जेष्ठांना प्राधिकरण मोफत कायदेशीर मदत करत असते. तरीही त्यांना काही वेळा हिंसेला आणि कौटुंबिक उपेक्षेला सामोरे जावे लागते; परंतु पारिवारिक वाद सामंजस्याने मिटवत त्यांनी कौटुंबिक सौहार्द तयार करावे.

सुजाता कानेटकर म्हणाल्या, न्यायालयीन कामकाजातील लोकच प्रेमाने जग जिंकता येते, असे म्हणत असतील तर आपण प्रेम देत, प्रेम घेत राहूया .मग सामंजस्याने आपले प्रश्न सुटण्यास मदत होईल .

याप्रसंगी येथील गतिशील सेवानिवृत्त अधिकारी संघटनेचे चंद्रकांत नलावडे यांनी जेष्ठांच्या वैद्यकीय उपचाराची गरज व्यक्त केली. जिहे (ता.सातारा) येथील अभिनव अभिनव ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जनार्दन घाडगे यांनी शासकीय कल्याणकारी योजना सुलभतेने पोहोचण्यासाठी ज्येष्ठांचा प्रतिनिधी सामाजिक न्याय समितीत नियुक्त करण्याची मागणी केली. 

विठ्ठलराव पिसाळ यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधीक्षक सौ. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी - पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना सक्तमजुरी
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या