सातारा : यंदा एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. संभाव्य पर्जन्यमान घट आणि भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन दि. 31 ऑगस्ट पर्यंत शहरी व ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला जलसाठा अत्यावश्यक परिस्थिती वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी वापरू नये, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. यासाठी सर्व जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील धरणे व जलाशयांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत धरणांमधून सिंचनासाठी प्रस्तावित अथवा सुरू असलेली पाणी आवर्तने तत्काळ बंद करण्याचे निर्देश शासनाने जारी केले आहेत. तसेच धरणांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा जपून वापरण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील विविध धरणे, जलाशय आणि इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर पाणी उपशावर कठोर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रभावी नियोजन करण्याची गरज शासनाने अधोरेखित केली आहे.