सातारा : शिवराष्ट्र ट्रेकर्स सातारा यांच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड या दोन दिवसांच्या पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले असल्याची माहिती शिवराष्ट्र ट्रेकर्सचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी दिली. दि.12 व 13 जुलै रोजी या मोहिमेचे आयोजन केले असून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शिवराष्ट्र ट्रेकर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
शरीराचा व मनाचा कस पाहणारी ही अत्यंत खडतर मोहीम असून पावनखिंडीतल्या रणसंग्रामाची प्रत्यक्ष अनुभूतीच या पदभ्रमंतीतून येत असते. स्वराज्यावर मोठ्या फौजफाट्यासह संकटरुपाने आलेला सिद्धी जौहर व त्याला शिवरायांच्या युद्धनितीने व वीर शिवा काशीद,वीर बाजीप्रभू देशपांडे,सरदार बांदल बंधू व असंख्य मावळ्यांच्या बलिदानाने त्यावर केलेली मात याचा प्रत्यक्ष थरार या मोहिमेत अनुभवण्यास मिळतो. यावेळी युवा शिवचरित्र अभ्यासक व शिवव्याख्याते समाधान जाधव यांचे ’पावनखिंडीतला रणसंग्राम’ हे अत्यंत प्रभावशाली व्याख्यान व शिवचरित्र अभ्यासक व शिवशाहीर शरद यादव व सहकारी यांचा शहिरी पोवाड्याचा कार्यक्रम यावेळी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या मातीतून,शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा 50 ते 55 किलोमीटरचा थरारक ट्रेक अनुभवण्यासाठी व ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत सहभागी होऊन वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि असंख्य मावळ्यांच्या शौर्याची अनुभूती घेण्यासाठी, शिवकालीन युद्धनीती अनुभवण्यासाठी आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन दत्ताजी मोहिते, सुनिल शेडगे, उध्दव पवार, सचिन जाधव, गणेश दुबळे, वर्षा ससाने, गौतम कोकाटे, अभिजित भोसले, निलेश पोरे, उद्धव निकम, शिवराज साळुंखे, जयदीप कोरे, रमेश चव्हाण यांनी केले आहे.