कराड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या, सोमवार दिनांक १५ जून रोजी कराड तालुक्यातील शहापूर येथे भेट देणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेले शहापूर गावचे सुपुत्र जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांच्या कुटुंबीयांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत. अर्जुन जाधव यांच्या आकस्मिक निधनामुळे सध्या शहापूर व परिसरात शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
या पार्श्वभूमीवर हुतात्मा जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील शहापूर येथे येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या भेटीदरम्यान ते जाधव कुटुंबाशी संवाद साधून त्यांचे सांत्वन करतील. हुतात्मा जवान अर्जुन जाधव यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी या विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी गावातील नागरिक, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहापूर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.