महायुतीच्या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली; जिल्हा परिषदेत झालेल्या राड्याचा बदला घेणार ? की शेवटच्या क्षणी पॅचअप होणार ?

by Team Satara Today | published on : 13 June 2026


सातारा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक शेवटच्या टप्प्यात भाजपने शनिवारी कराडमध्ये आयोजित केलेल्या महायुतीतील नेत्यांच्या बैठकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम करून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत-पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्याचा बदला घेणार? की शेवटच्या क्षणी पॅचअप होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता संघर्षाचे पडसाद विधान परिषद निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचे थेट संकेतच पालकमंत्री शंभूराज देसाईंनी दिले आहेत. महायुतीचे घटक पक्ष असूनही आम्हाला प्रचार आणि नियोजनासाठी बोलवत नाहीत. महायुतीतील नेत्यांच्या बैठकीचे आम्हाला निमंत्रण नाही. त्यामुळे 'आमची अवस्था येऊ नको, तर कुठल्या गाडीत बसू,' अशी झाली असल्याची खदखद पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील फक्त भाजपचे नेतेच महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारात दिसत आहेत. प्रचारासाठी तुम्हाला बोलवत नाहीत का? या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले की, निमंत्रण नसताना आम्ही त्यांना कुठल्या गाडीत बसू, असं म्हणायचं का? विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही बैठकांना शिवसेना व घटक पक्षांना विचारात घेतले जात नसल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. दरम्यान, शंभूराज देसाईंनी दरे गावी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यात तासभर चर्चा झाली. त्याचा तपशील मात्र समजू शकला नाही.

सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक आता रंगतदार वळणावर पोहोचली आहे. महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, सत्यजितसिंह पाटणकर, अशा मातब्बरांची फौज मैदानात उतरली आहे.

महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम असे दिग्गज नेते सक्रिय झाले आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे. तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पालघरमध्ये महसूल सहाय्यक तरुणीवर कोयत्याने ८ वार; आरोपी हायकोर्टात शिपाई, तरुणी दहिवडी इथल्या रहिवासी, हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद

संबंधित बातम्या