पालघर : पालघरमध्ये सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटनेने पालघर हादरले. तिच्या सहकाऱ्यानेच हा हल्ला केला आहे. आरोपीचं नाव अमोल मुळे असून तरुणीचं नाव स्नेहल सावंत असं आहे. हायकोर्टात शिपाई असलेला अमोल मुळे हल्ल्यानंतर फरार झाला आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्नेहल सावंत या मूळच्या सातारा जिल्ह्यातील दहिवडी इथल्या रहिवासी आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पालघर शहरात गोल्ड सिनेमा परिसरात शुक्रवारी सायंकाळी स्नेहल सावंत हिच्यावर भर रस्त्यात कोयत्याने वार करण्यात आले. तिच्या मानेवर ८ वार झाले आहेत. आरोपीने मागून येत अचानक हल्ला केला. मानेसह कंबरेवरही वार करण्यात आले आहेत. या प्रकाराने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अमोल मुळे याने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला नागरिकांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात नेलं. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणीची भेट घेऊन चौकशी केली.
स्नेहल जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात कार्यरत आहे. कामाच्या निमित्ताने तिची अमोल मुळे याच्याशी ओळख होती. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कोयत्याने सुरुवातीला वार केल्यानंतर स्नेहल जमिनीवर पडली. त्यावेळीही आरोपी अमोलने तिच्यावर अनेक वार केले. तिथून पळून जाताना हल्लेखोरानं त्याची बॅग आणि कोयता घटनास्थळीच टाकून दिला. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्नेहल सावंत या मूळच्या सातारा जिल्ह्यातील दहिवडी इथल्या रहिवासी आहेत,अशी माहिती समोर येत आहे.