सातारा : शहरातील राजवाडा परिसरात शुक्रवारी रात्री तीन युवकांनी भररस्त्यात वाद घालत हातात कोयता घेऊन गोंधळ घातल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित युवकांना पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी संजय निरंजन सहाने, अनिल प्रवीण चव्हाण आणि प्रशांत विजय गोळे (सर्व रा. जकातवाडी, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, राजवाडा परिसरात तीन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर त्यांनी हातातील कोयता फिरवत आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिन्ही युवकांना पकडले. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांना बोलावण्यात आले आणि संशयितांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, वादाचे नेमके कारण तसेच कोयता त्यांच्याकडे कसा आला, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.