कराड : सुपने येथे कोयना नदीत आजोबांसमवेत आज पोहण्यासाठी गेलेल्या बारा वर्षांच्या नातवाचा बुडून मृत्यू झाला. वरद शंकर कांबळे (रा. सुपने) असे मुलाचे नाव आहे. तो बुडाल्याची माहिती मिळताच सुपनेचे पोलिस पाटील कमलाकर कोळी व युवकांनी नदीपात्रात उडी मारून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचवण्यात यश आले नाही.
सुपने- किरपे पुलाच्या दरम्यान वाहणाऱ्या कोयना नदीच्या पाण्याच्या पात्रात आज सकाळी बंडू खाशाबा कांबळे हे त्यांचे नातू वरद याच्यासोबत पोहण्यासाठी गेले होते. या वेळी आजोबा नदीकाठाला बसून होते, तर वरद पोहत होता.
मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने नातू पाण्यात बुडू लागला. तेव्हा पुलावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला मुलगा बुडत असल्याचे लक्षात आल्याने त्याने मोठमोठ्याने आरडाओरड केली. या वेळी नदीपात्रात पोहणाऱ्या, तसेच शेजारी असणाऱ्या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
सुपनेचे पोलिस पाटील कोळी यांनी नदीत स्वतः उडी घेत शोधकार्यात सुरू केले. त्यांच्यासोबत जमीर पठाण, लखन पठाण, अमोल पाटील, निखिल पाटील, सूरज कोळी यांनीही नदीत उड्या घेऊन शोधकार्य राबवले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. शोधकार्य सुरू असताना पोहणाऱ्यांनाही पाचारण केले होते. दरम्यान, पोलिस पाटील कोळी यांना वरदचा पाण्यात मृतदेह सापडला. वरदच्या मृत्यूने सुपने गावात हळहळ व्यक्त होत आहे.