सातार्‍यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई; पान दुकानातून मोठा साठा जप्त, अन्न सुरक्षा विभागाची तपासणी मोहीम तीव्र

by Team Satara Today | published on : 12 June 2026


सातारा : शहरातील रविवार पेठेतील मार्केट यार्ड परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत रविवार पेठेतील एस के पान शॉप येथे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. शुभम राजू कांबळे यांच्यावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे .या कारवाईदरम्यान सुमारे 10 किलो वजनाचा पान मसाला व गुटखा प्रकारातील माल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत जवळपास 19 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

अन्न सुरक्षा विभागाला संबंधित दुकानातून बंदी असलेल्या पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकार्‍यांनी अचानक तपासणी मोहीम राबवली. तपासणीदरम्यान विविध ब्रँडचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यानंतर संपूर्ण साठा ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

राज्यात अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा विभागातही खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या आस्थापनांसह पान दुकाने, हॉटेल्स आणि अन्य व्यावसायिक ठिकाणांची नियमित तपासणी सुरू आहे. या कारवाईत अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी सहभाग घेतला.

गुटखा विक्रीविरोधात व्यापक मोहिमेची अपेक्षा

शहरात विविध भागांत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता या अवैध व्यवसायामागील पुरवठा साखळीपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या मते, अशा कारवायांमुळे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना आळा बसण्यास मदत होईल. तसेच घाऊक पुरवठादार, साठेबाज आणि अवैध वितरण करणार्‍या घटकांवरही कठोर कारवाई केल्यास प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवता येईलमात्र तो कामाचा धडाका सातार्‍याच्या अन्न औषध प्रशासन विभागाने दाखवणे गरजेचे आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माहुलीत युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
खऱ्या अर्थाने अस्पृश्यता निवारण्याचे कार्य सावरकरांनी केले - आनंद कुलकर्णी, अखिल भारत हिंदुमहासभेच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जयंती साजरी

संबंधित बातम्या