सातारा : तारळी धरण वळण रस्त्याच्या कामाचे प्रलंबित देयक मिळत नसल्याने ठेकेदार विजयसिंह पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात होत असलेल्या विलंबामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात 17 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2022 मध्ये मंजूर झालेल्या तारळी धरण वळण रस्त्याच्या कामाची अंमलबजावणी सुरू असूनही संबंधित देयकांची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. कामासाठी आवश्यक असलेले कॉंक्रिट मिक्स डिझाइन मे 2025 मध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागाने तयार करून मंजुरीसाठी पाठविले होते. त्यास ऑक्टोबर 2025 मध्ये मान्यता मिळाली. मात्र, त्यानंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही वेळेत झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संबंधित प्रकरणात सातारा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकार्यांकडून दिरंगाई होत असल्याने देयक अडकल्याचा आरोपही त्यांनी केला. कामासाठी कर्ज घेऊन मोठी आर्थिक गुंतवणूक केल्यामुळे सध्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पाटील यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित अधिकार्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. येत्या काही दिवसांत प्रश्न निकाली न निघाल्यास 17 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.