जागतिक दर्जाची आरोग्य सेवा संस्था उभारण्यासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; नवी मुंबईत जागतिक दर्जाची ‘मेडिसिटी’, 10 हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती

by Team Satara Today | published on : 10 June 2026


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हील इन इंडिया’ या संकल्पनेला बळ देत, महाराष्ट्रात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (NMIMC) विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन, जगातील नामांकित ‘क्लीव्हलँड क्लिनिक’, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १.२ अब्ज अमेरिकी डॉलरची (सुमारे १० हजार कोटी रुपये) गुंतवणूक होणार असून, १० हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत.

मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यांना एकाच छताखाली आणणारी ही देशातील पहिलीच एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था असेल. क्लीव्हलँड क्लिनिकसारख्या जागतिक संस्थेने महाराष्ट्रासोबत भागीदारी करणे, हा राज्यासाठी अभिमानास्पद आणि आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारा क्षण आहे."

२५० एकरवर भव्य कॅम्पस आणि जागतिक सुविधा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे २५० एकर क्षेत्रावर ही ‘मेडिसिटी’ उभारली जाणार आहे. भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून हे ओळखले जाईल. या कॅम्पसमध्ये केवळ रुग्णालयेच नसतील, तर वैद्यकीय व परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आरोग्य सेवा नवोन्मेष केंद्रे विकसित केली जातील.

जागतिक दिग्गजांची उपस्थिती

क्लीव्हलँड (ओहायो) येथील मुख्यालयात झालेल्या या करारादरम्यान मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टॉमिस्लाव मिहाल्जेविक, आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी मित्तल आणि आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन उपस्थित होते. या प्रकल्पात ‘क्लीव्हलँड क्लिनिक’ प्रमुख सल्लागार संस्था म्हणून काम पाहणार असून, एलएनएमआयआयटी (LNMIIT) जयपूर ही संस्था प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी सहकार्य करणार आहे.

या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य सेवा आता महाराष्ट्रात उपलब्ध होणार असून, राज्याला वैद्यकीय पर्यटनाचे नवे केंद्र बनवण्यास मोठी मदत होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जावळी तालुका बनतोय स्ट्रॉबेरी लागवडीचे केंद्र ; ६०० हेक्टरवर मदर प्लांट लागवडीची तयारी
पुढील बातमी
साताऱ्याच्या सुपुत्राचा शौर्यगौरव; लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगेंना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र

संबंधित बातम्या