सातार्‍याच्या खाद्यविश्वातील एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपले; सुपनेकर भोजनालयाचे संचालक नितीन सुपनेकर यांचे निधन

by Team Satara Today | published on : 10 June 2026


सातारा : सातार्‍यातील प्रसिद्ध शाकाहारी भोजनालय सुपनेकर भोजनालय’ यांना ओळख मिळवून देणारे आणि आपल्या आदरातिथ्यपूर्ण स्वभावामुळे अनेकांच्या मनात स्थान निर्माण करणारे उद्योजक नितीन सुपनेकर यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच खाद्यप्रेमी वर्तुळात शोककळा पसरली आहे.

खाद्यव्यवसायात गुणवत्ता, सातत्य आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध या तत्त्वांवर काम करत नितीन सुपनेकर यांनी सुपनेकर भोजनालय हे सातार्‍यातील विश्वासार्ह नाव बनविले. ग्राहकांना केवळ भोजन नव्हे, तर घरगुती वातावरण आणि आत्मीयतेची अनुभूती देणे ही त्यांची खास ओळख होती. त्यांच्या सौम्य आणि स्नेहपूर्ण वागणुकीमुळे अनेकांशी त्यांनी कायमचे ऋणानुबंध जुळवले.

व्यवसायासोबतच सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. गोल मारुती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध धार्मिक उपक्रमांना चालना दिली. तसेच सप्ततारा सांस्कृतिक मंडळ आणि विविध मित्रपरिवाराच्या उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत असत. समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले.

नितीन सुपनेकर यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सातार्‍याने एक संवेदनशील उद्योजक, समाजाभिमुख कार्यकर्ता आणि अनेकांचा जिवलग मित्र गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव; आंदोलनकर्त्यांनी केली जोरदार घोषणाबाजी
पुढील बातमी
श्रीमती शांताबाई कदम यांचे निधन

संबंधित बातम्या