सातारा : सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने बुधवारी (दि. 10 जून) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सातारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव घालून आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
युनियनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजवर्धन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुरक्षा रक्षकांना सिक्युरिटी गार्ड बोर्डप्रमाणे मासिक वेतन देणे, 2017 ते मे 2026 या कालावधीतील वेतनातील फरकाची रक्कम अदा करणे, नियमित पेमेंट स्लिप देणे, कामाचे आठ तास निश्चित करणे, साप्ताहिक सुट्टी देणे, विमा संरक्षण व आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देणे आदी मागण्या करण्यात आल्या.
तसेच जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याची आणि कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करू नये, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांची फसवणूक करून त्यांच्या हक्काच्या पैशांची लूट केल्याचा आरोप करत स्नेहा सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही युनियनच्या पदाधिकार्यांनी दिला.