सातारा : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत हिच्या कारला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. आगामी 'कपबशी' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पुण्याहून सांगलीकडे जात असताना हा अपघात घडला. महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा विचित्र अपघात झाला असून, यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात अभिनेत्री पूजा सावंत यांच्यासह सर्व सहकारी कलाकार सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता ऋषी मनोहर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कपबशी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सर्व कलाकार गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील विविध शहरांमध्ये प्रवास करत आहेत. मंगळवारी दुपारी हे सर्वजण कारने पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होते. त्यांची कार काशीळ येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आली असता, तीन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली.
या धडकेत पूजा सावंत प्रवास करत असलेल्या कारसह इतर वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता ऋषी मनोहर यांना मुक्का मार लागला आहे. कारमधील इतर सर्व जण पूर्णपणे सुखरूप आहेत. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.