तर माझाच पहिला नंबर असेल - नगराध्यक्ष अमोल मोहिते; सुशांत मोरे यांच्या तक्रारीला प्रत्युत्तर; दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच

by Team Satara Today | published on : 09 June 2026


सातारा : "अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात माझे घर रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत येत असेल, तर ते स्वतःहून काढून घेण्यात माझाच पहिला नंबर असेल. या कारवाईत मी कोणतीही सवलत मागणार नाही," असे स्पष्ट प्रतिपादन सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले. माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

शाहू चौक ते बोगदा या मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, अदालत वाडा परिसरासह संबंधित भागातील अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

गुरुवार पेठेतील रस्ता रुंदीकरण प्रक्रिया हेतुपुरस्सर थांबवून समर्थ मंदिर चौक ते बोगदा या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आणि त्यातून नगराध्यक्षांनी स्वतःच्या घराचे अतिक्रमण वाचवले, असा आरोप करत सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीला उत्तर देताना मोहिते यांनी कोणताही पक्षपात झालेला नसल्याचा दावा केला.

ते म्हणाले, समर्थ मंदिर चौक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होती. त्यामुळे त्या भागातील रस्त्यात येणाऱ्या मिळकती हटविण्यास प्राधान्य देण्यात आले. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने आपल्या मिळकतीचा वाढीव भाग काढून प्रशासनाला मोठे सहकार्य केले. त्यामुळे कारवाई सुरळीतपणे पूर्ण झाली.

समर्थ मंदिर चौक ते बोगदा या भागातील रस्ता रुंदीकरण प्रक्रिया काम पूर्ण झाले असून, आता त्या मार्गावरील डांबरीकरण व पॅचिंगची कामे हाती घेतली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अदालत वाडा ते शाहू चौक या मार्गावरील रस्ता रुंदीकरण प्रक्रिया केली जाणार असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्वतःच्या घरासंदर्भातील आरोपांवर बोलताना मोहिते म्हणाले, "माझे घर रस्ता रुंदीकरणात येत असल्याचे काहीजण सांगत आहेत. प्रशासनाच्या नोंदींनुसार तसे आढळल्यास मी स्वतःहून ते  काढून घेईन. त्यामध्ये माझाच पहिला नंबर असेल. नियम सर्वांसाठी समान आहेत आणि त्यातून मीही अपवाद नाही." नगराध्यक्षांच्या या भूमिकेमुळे अतिक्रमण कारवाईसंदर्भातील सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना अपात्र करण्यात यावे - सुशांत मोरे; स्वत:चे अतिक्रमण हटवून रस्ता रुंद करुन दाखवण्याचे आव्हान
पुढील बातमी
नागरिकांचे अधिकार व जबाबदारीच्या जनजागृतीसाठी अभियान राबविणार : जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे

संबंधित बातम्या