भुईंज : राष्ट्रीय महामार्गावर जोशीविहीरनजीक हॉटेल रायगड इन समोर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ठोकरल्याने रस्ता ओलांडणारा पादचारी जागीच ठार झाला. विशाल गुलाब वाघोले (वय ५०, रा. वडगाव शेरी, ता. हवेली, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर रस्ता ओलांडत असलेले विशाल वाघोले यांना पुणे बाजूकडे जाणारी कारने (एमएच ०९ इजे ९८१०) जोरदार धडक दिली.
यात ते जागीच ठार झाले. घटनेनंतर विशाल वाघोले यांना जखमी अवस्थेत तिथेच सोडून कारचालकाने पलायन केले. भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाजीराव तोडरमल यांनी तपास करून कारचा शोध लावला व मृतदेह शवविच्छेदनासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला.