सातारकर सुदेष्णा शिवणकर हिची सुवर्णझेप; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

by Team Satara Today | published on : 09 June 2026


सातारा  : तैवानमधील कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय महिला चार बाय १०० मीटर रिले संघाचे सुवर्ण यश; सातारकर सुदेष्णा शिवणकरच्या दमदार धावण्याने जागतिक स्तरावर भारताचा झेंडा उंचावला. जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये महिलांच्या चार बाय १०० मीटर रिले स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक पटकाविले. त्यात सातारकर धावपटू सुदेष्णा शिवणकर हिने दमदार कामगिरी करत आपला ठसा उमटविला.

तैवानमधील न्यू तैपेई सिटीमध्ये सध्या जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर स्पर्धा सुरू आहे. त्यात शनिवारी बानकियाओ स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या चार बाय १०० मीटर रिले स्पर्धेत भारतीय संघाने अग्रस्थान मिळवत सुवर्णपदक पटकाविले. या संघात साताऱ्याची अव्वल धावपटू सुदेष्णा शिवणकर हिचा समावेश आहे.

सुदेष्णाने एस. एस. स्नेहा, श्रावणी नंदा, तमन्ना यांच्या सोबतीने ही स्पर्धा ४४.०७ सेकंदांची वेळ नोंदवित पूर्ण केली. उल्लेखनीय म्हणजे या संघाने स्पर्धेच्या विक्रमाची बरोबरी साधत सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी स्पर्धेत दुसऱ्या स्थानी राहिलेल्या व्हिएतनामवर ०.३१ सेकंदांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

जावळी तालुक्यातील खर्शी या छोट्याशा गावातून सुदेष्णाचा प्रवास सुरू झाला आहे. आजवर राष्ट्रीय पातळीवर ६४, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तीन पदके तिने मिळविली आहेत. ''खेलो इंडिया'' स्पर्धेत सलग सहा वर्षे सुवर्णपदक मिळणारी सुदेष्णा ही देशाची एकमेव खेळाडू आहे. गेली आठ वर्षे ती राष्ट्रीय प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अथक मेहनत घेऊन सराव करत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह तीन विद्यापीठांचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांच्या मागणीनंतर शासनाचा निर्णय
पुढील बातमी
जोशीविहीरनजीक हॉटेल रायगड इन समोर कारने ठोकरल्याने रस्ता ओलांडणारा पादचारी जागीच ठार

संबंधित बातम्या