सातारा : फलटण तालुक्यातील दुधेबावी गाव परिसरात पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तुले, एक जिवंत काडतूस आणि दुचाकीसह सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार पेठ परिसरात संशयितांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. तपासणीदरम्यान संबंधितांकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसताना शस्त्रे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दोन गावठी बनावटीची पिस्तुले, एक जिवंत काडतूस आणि पल्सर दुचाकीचा समावेश आहे.
या कारवाईनंतर प्रतिक खुंटे, प्रदीप गोरे उर्फ सोन्या, करण घोलप आणि समीर खवळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार पुढील तपास करीत आहेत.