सातारा-सांगलीतील राजकारण एका मंत्र्यामुळे दूषित - अभयसिंह जगताप; आमची लढाई व्यक्तीविरोधात नसून एका प्रवृत्तीविरोधात

by Team Satara Today | published on : 06 June 2026


सातारा : सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण एका मंत्र्याच्या कार्यपद्धतीमुळे दूषित झाले आहे. त्यांनीच भाजपची प्रतिमा मलिन केली आहे, अशी टीका सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली. आमची लढाई व्यक्तीविरोधात नसून एका प्रवृत्तीविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जगताप म्हणाले, या निवडणुकीत सरळ लढत होणार असून एकूण ८९५ मतांपैकी ५०० मते मिळवण्याचे लक्ष्य आहे. सत्ताधाऱ्यांच्या दुजाभावाच्या राजकारणामुळे भाजपविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षातील सदस्यांसह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना विकासनिधी उपलब्ध करून दिला जात नाही. '१५ ते २० हजार लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निधी नाकारण्याची भूमिका घातक आहे. टेंडर प्रक्रियाही केंद्रीकृत करण्यात आल्याने स्थानिक पातळीवरील विकासकामांवर परिणाम होत आहे,' असे ते म्हणाले.

ही निवडणूक आव्हानात्मक असून पैशांचा प्रभाव दिसू शकतो. मात्र, मी विचारांच्या आधारावर मते मागणार आहे. भाजपविरोधी विचार असलेले तसेच अन्याय झाल्याची भावना असलेले अनेक सदस्य स्वाभिमानाच्या या लढाईत साथ देतील.गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असूनही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तसाच यावेळीही निकाल लागेल. तसेच शेखर गोरे हे भाजपच्‍या नेत्‍यांवर नाराज आहेत. आम्ही दोघेही माणदेशी सुपुत्र असल्याने ते मला मदत करतील, असाही विश्‍वास जगताप यांनी व्‍यक्‍त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नगरपालिकेची ही इमारत सातार्‍याच्या वैभवात भर टाकेल : खा. उदयनराजे भोसले ; सातारा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी
पुढील बातमी
पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने उपक्रम

संबंधित बातम्या