वडूज : छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रशासन कुशल आणि जनताभिमुख होते. गोरगरीब, वंचित, पीडित जनतेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. जगातील सर्वोत्कृष्ट राजा म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. त्यांच्या प्रशासनाचा आदर्श घेऊन आपण वाटचाल करायला हवी" असे प्रतिपादन खटाव तालुक्याचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. सभापती वनिताताई दुबळे, पंचायत समिती सदस्य हनमंत बोटे, सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत दळवी तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गुढी उभारून वंदन केल्यानंतर आपल्या मनोगतात श्री कदम म्हणाले,"6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने रयतेला राजा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वच बाबतीत सर्व जगासमोरील आदर्श आहेत. 1630 ते 1680 अशा आपल्याला मिळालेल्या केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांनी संपूर्ण जीवन जनतेसाठी वेचले. आदर्श राजा कसा असावा याचा वस्तूपाठ जगापुढे घालून दिला.
शेतकरी, स्त्रिया, वंचित, पीडित अशा सर्व घटकांसाठी त्यांनी कायदे केले आणि सक्त अंमलबजावणी केली. रयते मधील कोणत्याही घटकावर अन्याय, अत्याचार होऊ नये .सर्वांना न्याय मिळावा ही त्यांची भूमिका अनुसरणे आज अत्यंत गरजेचे आहे. शासन प्रशासन आणि समाज यांच्यातील नाते अत्यंत महत्त्वाचे असते. हा त्रिकोण अधिकाधिक सशक्त होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची विचार अवलंबणे गरजेचे असून त्यानुसार आपण वाटचाल करायला हवी."
विस्ताराधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी आभार मानले.