सातारा : ट्रिपल क्राऊन क्रिकेट अँड स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील चार महिला क्रीडापटूंना सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.
सातारा नगर परिषद आणि ट्रिपल क्राऊन क्रिकेट अँड स्पोर्ट्स फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातारा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू तनुश्री भोसले, आंतरराष्ट्रीय नेमबाज अदिती स्वामी, आंतर राष्ट्रीय धावपटू अनुष्का कुंभार आणि राष्ट्रीय मुष्टीयुद्ध खेळाडू आर्या बारटक्के यांना कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते सन्मान पुरस्कार आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी होते.
प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी संगीता जगताप, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव इर्शाद बागवान, फौंडेशनचे प्रमुख राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महिला खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द, जिगर, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय, जागतिक पातळीवर अफलातून कामगिरी करून जिल्ह्याचा, देशाचा गौरव वाढवला असून त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा सन्मान करण्यात आला.
खेळाडूंच्या पाठीशी शासन ठामपणे उभे : सुहास पाटील
यावेळी सुहास पाटील म्हणाले, या खेळाडूंची कामगिरी गौरवास्पद असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. क्रीडा क्षेत्रात अशी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून अशा खेळाडूंना प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून सेवेत दाखल करून त्यांचा सन्मान केला जातो. शासनाचे क्रीडा धोरण व्यापक असून त्याचा लाभ गुणी खेळाडूंना मिळतो. अभ्यास आणि खेळ याची यशस्वी सांगड घालून प्रामाणिक प्रयत्न केले तर निश्चित यश मिळते. सातारा जिल्हा क्रीडासंकुला साठी एक विकास आराखडा करण्यात येणार असून त्याचा लाभ खेळाडूंना होईल. क्रिकेट सारख्या खेळास प्रोत्साहन देऊन क्रिकेटर्सना चांगले व्यासपीठ या संस्थेने उपलब्ध केले आहे. सातारा जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सातारा जिल्ह्यातील मुलींनी क्रिकेटमध्ये मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे, असे पाटील म्हणाले.
यावेळी त्यांच्या हस्ते महिला संघाची कर्णधार सानिका पाटील, तेजश्री ननावरे, समृद्धी बनवने, भूमी फाळके, निशिगंधा नलावडे, रिद्धी कदम, मनस्वी जाधव, शांभवी देशमुख, अदिती जाधव, श्रावणी बर्गे, सई पिसाळ, वैदेही जोशी, सायली फडतरे, वेदिका सुतार, रिया सावंत यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
प्रशांत साळुंखे यांनी प्रास्तविकात फौंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी नगर सेवक भालचंद्र निकम, धनंजय जाधव, प्रमोद जाधव, दीपक जाधव, उदय मोहिते, रमेश पवार, आदित्य आहेरराव, तुषार पवार उपस्थित होते.