उडतारे : शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवा नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्गदर्शनाखाली उडतारे, ता. वाई येथे आयोजित करण्यात आलेल्या 'महा आरोग्य शिबिरास' पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील काळेश्वर मंदिर सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात ५७२ हून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे, कार्याध्यक्ष राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य उपाध्यक्ष जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले होते.
विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार
ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आयोजित या शिबिरात रुग्णांची रक्त तपासणी, मधुमेह, ईसीजी (ECG), डोळे तपासणी, दंतरोग व अस्थिरोग यांसारख्या विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक ती औषधेही मोफत देण्यात आली.
प्रमुख मान्यवर आणि वैद्यकीय पथकांचे योगदान
या आरोग्यदायी कार्यात वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, उपजिल्हाप्रमुख संदीप फणसे, रणजीत साबळे, संपर्क प्रमुख राजेंद्र बर्गे, सातारा शहर प्रमुख अक्षय बामणे आणि वाई तालुका प्रमुख प्रतीक काळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच आयोजक धनाजी बाबर आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बाबर, उत्तरा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, प्रकाश पवार,नारायण जाधव,उडतारेच्या सरपंच सौ. अर्चना पवार यांनी व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रकाश जाधव व त्यांची टीम, मेडिकल कॉलेज साताराचे डॉ. मारुती जरग व त्यांची टीम, सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिया चव्हाण व स्टाफ नर्सेस, तसेच उडतारे येथील डॉ गायत्री उगाळे आणि सर्व आशा वर्कर्स, स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.
"जनसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन ग्रामीण भागातील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांच्या सांघिक सहकार्यामुळेच हे आरोग्यदायी कार्य यशस्वी झाले असून, आगामी काळातही जनसेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू," असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेबद्दल परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष आणि सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानले आहेत.