सातारा : सातारा तालुका पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावत एका युवकाला अटक केली असून त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सातारा तालुका आणि सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
रेहान सिकंदर मुलाणी (वय 20, रा. कोडोली, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. परळी परिसरातून मार्च महिन्यात चोरीस गेलेल्या एका दुचाकीच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली होती. सातारा शहर परिसरात चोरीच्या वाहनासह एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची खबर मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानुसार कोडोली परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत आरोपीने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या आधारे सातारा तालुका पोलीस ठाण्यातील दोन आणि सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार संदीप कर्णे करीत आहेत. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, सहाय्यक फौजदार उमेश माने, पोलीस हवालदार संदीप कर्णे, दादा स्वामी, शिखरे, पंकज ढाणे, मनोज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव, प्रल्हाद ढाकरे, पोलीस हवालदार संदीप आवळे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत मोरे, उमेश बगाडे, पाचांगणे यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकार्यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.