सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत रणधुमाळीला वेग; दोन प्रमुख आघाड्यांमध्ये सरळ मुकाबला

by Team Satara Today | published on : 04 June 2026


सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत अखेर दोन प्रमुख राजकीय आघाड्यांमधील थेट संघर्ष निश्चित झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शिवसेनेचे उमेदवार तानाजीराव पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यात सरळ लढत रंगणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तानाजीराव पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला. यावेळी राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

या घडामोडीनंतर निवडणुकीतील समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. महायुतीच्या वतीने धैर्यशील कदम यांना भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यामागे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची ताकद उभी आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ असल्याने नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील लोकप्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून दोन्ही बाजूंनी मतदार सदस्यांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे.

सुरुवातीला बहुरंगी होण्याची शक्यता असलेली ही निवडणूक आता दोन प्रमुख राजकीय आघाड्यांमधील प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील राजकीय वातावरण तापू लागले असून आगामी मतदान आणि त्यानंतरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधान परिषद रणधुमाळीत महायुतीची हालचाल; धैर्यशील कदम-शंभूराज देसाई यांच्या भेटीची चर्चा
पुढील बातमी
सराईत दुचाकी चोरटा जेरबंद ; चार गुन्ह्यांची उकल; सातारा तालुका पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या